मुंबईच्या विकासासह अनेक विषयांवर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा…

0

उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)

बदलत्या मुंबईवर पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त

मुंबई दिनांक १९: मुंबईच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी मुंबईच्या बदलेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्सुकतेनं जाणून घेतले. आज राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चाही केली.

मुंबई झोपडीमुक्त करून या महानगरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजना, त्याचप्रमाणे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईची आर्थिक क्षमता वाढविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. प्रामुख्याने डीप क्लीनसारख्या मोहिमेतून मुंबईची अंतर्गत स्वच्छता कशी करण्यात येत आहे तेही पंतप्रधानांनी उत्सुकतेने जाणून घेतले. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू यामुळे वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत झाली आहे तसेच मेट्रोमुळे दैनंदिन प्रवासी वाहतूक कशी सुधारत आहे याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणाचा प्रश्न महत्त्वाचा असून या संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून योगाचा प्रसार कसा व्हायला पाहिजे यासारख्या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.

यावेळी पंतप्रधानांसमवेत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने देखील हरित ऊर्जा, क्रीडा, शिक्षण, कृषी तंत्रज्ञान, मत्स्यपालन, यांसह विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तर न्यूझीलंडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंद, क्रिकेटपटू एजाज पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्स, अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, न्यूझीलंड पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी मॅट यंग, समाजमाध्यम सल्लागार जेकब ओ’फ्लाहर्टी, मार्क टॅलबोट, न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त पॅट्रिक राटा, जोआना केम्पकर्स, मॅथ्यू आयर्स, मुंबईतील उप-उच्चायुक्त ग्राहम राऊस व उद्योजक हे देखील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *