युद्धग्रस्त भागातील भारतीयांना सुरक्षित परत आणा : के. रवि ( दादा ) यांची केंद्र सरकारसहमागणी

0


मुंबई : प्रतिनिधी
परदेशातील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा संपूर्ण राष्ट्राच्या चिंतेचा विषय असल्याचे मत इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्यक्ष के. रवी (दादा) यांनी व्यक्त केले. त्यांनी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करून अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे स्वदेशी आणावे, अशी मागणी केली.
के. रवी दादा म्हणाले की, परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा हा राजकारणाचा नव्हे तर राष्ट्रहिताचा विषय आहे. “आम्हाला भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे; मात्र परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तातडीने प्रभावी कृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिक सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि शक्य तितक्या लवकर भारतात परत यावा, ही आमची ठाम भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी आवश्यक असल्यास विशेष बचाव मोहीम राबवावी, अतिरिक्त विमान सेवा सुरू करावी तसेच परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये समन्वय अधिक मजबूत करावा, अशीही त्यांनी सूचना केली.
या विषयावर सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्रित भूमिका घेऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. माध्यमांनी जबाबदारीने काम करत अफवा रोखून सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.
के. रवी दादा पुढे म्हणाले की, त्यांची संस्था सरकारला आवश्यक ते सहकार्य, माहिती व समन्वय देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
“भारतीय कुठेही असला तरी तो देशाचा आहे — त्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण राष्ट्र एकत्र उभे राहिले पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला आलोक कुमार कासलीवाल (ओनर – एस कुमार्स), श्री. प्रितम आठवले, श्री. सुरेश यादव (अध्यक्ष – क्रांती ग्राम विकास संस्था )श्री. नरेन निकम, श्री. नाशिर पठाण यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *