
मुंबई, दि.7 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे महा विधी सेवा शिबीर आणि महा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीमध्ये शासकीय विभागांचे विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या स्टॉलवर विभागांकडून जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून यावेळी न्यायमूर्ती अनिल सुब्रमण्यम व न्यायमूर्ती स्वाती चव्हाण, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विविध विभागांच्या स्टॉलवर देण्यात येणाऱ्या माहितीचा मुंबईतील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहरचे सदस्य सचिव अनंत देशमुख यांनी केले आहे.