कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून युवकांचे सक्षमीकरण व कौशल्य विकास सर्वांच्या सहभागातून विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 1 : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे सक्षमीकरण आणि त्यांचा कौशल्य विकास होईल, त्यामाध्यमातून राज्यात कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार  निर्मितीच्या चळवळीला मोठी गती प्राप्त होईल. सर्वांच्या सहभागातून या विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू”, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यात विशेषत: शहरी भागात केंद्रीत झालेली कौशल्य विकासाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी येत्या सहा महिन्यात राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्र सुरु करण्यात येतील, अशी घोषणा यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

आज एलफिस्टन टेक्निकल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्टस्, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. अशा विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनानेही कौशल्य विकासाच्या कामात चांगली आघाडी घेतली आहे. कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आता युवकांसाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे विद्यापीठ राज्यातील कौशल्य विकासाच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या 6 महिन्यात ग्रामीण भागात 1 हजार कौशल्य केंद्र सुरु करणार

– कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होत आहे. लवकरच याच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन केले जाईल आणि २०२४ पूर्वी नव्या इमारतीत विद्यापीठाचे कामकाज आणि अभ्यासक्रम सुरु होतील. विद्यापाठातील अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकविण्यात येतील. राज्यात येत्या वर्षभरात ५ लाख युवकांना रोजगार देण्यात येईल. त्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत व्यापक कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

कौशल्य विद्यापीठ हे शहर केंद्रीत राहणार नाही, ग्रामीण भागातही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर येत्या सहा महिन्यांत राज्यातील ग्रामीण भागात १ हजार कौशल्य केंद्र उभारण्यात येतील. या कामामध्ये राज्यातील उद्योगांनीही सहकार्य करावे, त्यांच्या उद्योगाला आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणारी कौशल्य केंद्रे उभी करावीत, यासाठी राज्य शासनामार्फत उद्योगांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्टस् यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जीवनामध्ये मार्गदर्शकाची (Mentor) भूमिका अत्यंत महत्वाची असते. एक चांगला मार्गदर्शक हा विचार करायला तसेच सत्याचा आदर करायला शिकवतो. अपयश हा सर्वोत्तम शिक्षक आहे. अपयशाचे तसेच त्याच्या कारणांचे विश्लेषण करा आणि अपयशातून शिका, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरु डॉ. पालकर यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या भावी वाटचालीची माहिती दिली. विद्यापीठ मुंबई केंद्रीत न ठेवता राज्यातील सहा भागांमध्ये त्याचा विस्तार करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या ४ वर्षात २ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठामार्फत कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी विक्रमसिंह यादव यांनी आभार प्रदर्शन केले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *