तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

0

            मुंबई, दि. 7 : सतगुरु श्री सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र, पोहरादेवी, ता. मानोरा जि. वाशिम या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी  दिले. मंत्रालयात  झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

            या बैठकीला वाशिमचे जिल्हाधिकारी एस शन्मुगराजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, महावितरण, ऊर्जा विभाग, वित्त विभाग यासह इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            संग्रहालय बांधकामाचा आढावा व अतिरिक्त मागणी, बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा, प्रकल्पासाठी सौर उर्जेचा वापर करणे, अंतर्गत विद्युतीकरण, अंतर्गत गॅलरी डिझाईन निविदा, केसुला वन उद्यान, वाई-गोळ-पोहरा-उमरी राष्ट्रीय महामार्ग, बोटॅनिकल गार्डन यासह इतर महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

            बंजारा समाजाच्या पारंपरिक, सांस्कृतिक आणि जनजीवनाचे एकत्रित संग्रह असणारे भव्य संग्रहालय येथे उभे राहणार आहे. बंजारा समाजाची उत्पत्ती कशी झाली, प्राचीन तांडा, जलवाहतूक, बैलगाडी वाहतूक, लग्न विधी व इतर सामाजिक समारंभ अशी विविध माहिती देणारे सचित्र देखावे, प्रकाशयोजना आणि दृक श्राव्य माध्यमातून प्रदर्शित केले जाणार आहेत. पंजाबमधील ‘विरासत-ए-खालसा’ या धर्तीवर तयार होत असलेले हे संग्रहालय जगभरातील पर्यटक व अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या कामास गती देऊन जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *