
कोरोना काळात परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने दीड हजार रूपये अनुदान घोषित केले आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. रिक्षाचालकांनी अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज भरताना संकेतस्थळावर येणा-या अडचणी समजून घेण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद साडविलकर व संपर्कप्रमुख गिरीश कटके यांनी जनजागृती व मदत कार्यशाळेचे आयोजन साकीनाका येथील गुरुकुल क्लासेस मध्ये केले होते.
यावेळी बोलताना अनिल गलगली म्हणाले की दीड हजार रूपये आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना एका विशिष्ट संकेतस्थळावर अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्ज भरतेवेळी रिक्षाचालकांचा आधारक्रमांक बॅक खाते व भ्रमणध्वनी क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. वैयक्तीक माहितीसह वाहन चालविण्याचा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक तसेच करोना काळात मृत रिक्षाचालक धारकांच्या वारसांना लाभ मिळावा इ.माहितीची जनजागृती करण्यात आली. यावेळी बाबू बत्तेली, एड कैलास आगवणे, चारूदत्त पावसकर, संतोष वेंगुर्लेकर, रत्नाकर शेट्टी, आनंद सरतापे इ.मान्यवर उपस्थित होते.