मुंबई, दि. 17 : पर्यटनविषयक कामांचे काटेकोरपणे नियोजन करून कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पर्यटन विकास समितीच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, प्रादेशिक पर्यटन विकास योजना, गड किल्ले आणि ट्रेकींग पाँईट येथे बायोटॉयलेटस उभारणे, बीच शॅक्स धोरणातंर्गत बीच फॅसिलिटेशन सेंटरची कामे, पर्यटनविषयक सोयी सुविधांची कामे, प्रस्तावित उपक्रम व कामे, राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करणे याशिवाय पर्यटन विषयक विविध विकास कामे नियोजनपूर्वक करा. कामांचे वेळापत्रक तयार करा आणि कामे विहीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
रायगड किल्ल्यावर सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करावी
– पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढ: किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्रीय पुरातत्व विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने येथील सुरक्षा चौकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
यांसंदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते. या बैठकीस सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रांताधिकारी राहुल मुंडके, उपअधीक्षक जगदीश काकडे, ट्रेकर आणि दुर्गप्रेमीचे राजेंद्र फडके, रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य रघुजी राजे आंग्रे, केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे राजन दिवेकर व फाल्गुनी काटकर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, रायगड किल्ला परिसरात अस्वच्छतेबाबत तसेच सुरक्षा चौकीबाबत दुर्गप्रेमी आणि इतिहास संशोधकांकडून तक्रारी येत आहेत. हा परिसर आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याच्या जतन व संवर्धनामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रायगड किल्ल्यावर परिसर स्वच्छता राखणे, या परिसरात उभारण्यात आलेल्या सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत स्थानिक प्रशासनाने तत्काळ बैठक आयोजित करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.