
मुंबई, दि 16 : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान देत आहे. फ्रीज, एसीसारख्या उपकरणांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अशा विविध पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी स्वत:पासून सुरूवात करून हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जागतिक ओझोन दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या प्रतिनिधी शोको नोडा, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार राजश्री रे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ओझोन कक्षाचे अतिरिक्त संचालक आदित्य नारायण सिंग, मुंबईतील विविध शाळांचे विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते