पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा – रविंद्र चव्हाण

0
source.


            मुंबई, दि. 20 : पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूल समितीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युद्धपातळीवर करण्यात यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.

            पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलसंदर्भात स्थापन केलेल्या समितीची बैठक आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, महापालिका आयुक्त अनिल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.जी.पालवे, पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, क्रीडा विभागाचे प्रभारी उपसंचालक स्नेहल साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, प्र.जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

            पालघरमध्ये 16 एकरच्या प्रशस्त भूखंडावर जिल्हा क्रीडा संकूल प्रस्तावित करण्यात आले आहे. या संकूलाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर झालेला असून दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. संकूल उभारणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया आठवड्याभरात सुरु करुन पुढील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना श्री. चव्हाण यांनी दिली.

            श्री. चव्हाण यांनी प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा आढावा घेतला. या क्रीडा सुविधांमध्ये 400 मीटरचा ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, विविध खेळांची क्रीडांगणे, फीटनेस सेंटर, जलतरण तलाव, इनडोअर मॉल, मुलामुलींचे वसतिगृह, खेळाचे साहित्य आदी विविध बाबींचा समावेश आहे.

            प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने परिपूर्ण होतील व हे काम उत्कृष्टरित्या पार पडेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत संकुलाच्या उभारणीच्या कामात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग व त्यांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *