
सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा
– जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ०२ : महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरच्या वांद्रे पूर्व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती निधी चौधरी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अजित साखरे हे उपस्थित होते