‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातून सव्वा कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी – प्रा.डॉ. तानाजी सावंत

0
google image.


            मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’स राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यातील सुमारे एक कोटींहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

            स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील एक कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी अवघ्या वीस दिवसात झाली हे विशेष आहे. राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह मोठ्या महानगरातील मॉडर्न वसाहतीत अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणीस करण्यात येत असून ग्रामीण भागात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

            या अभियानाचा एक कोटीचा टप्पा ओलांडल्यानंतर आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. अभियानास अतिदुर्गम, आदिवासी पाडे, तांडा वस्तीसह खेड्यातील महिलांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे. कधीच दवाखान्याची पायरी न चढलेल्या माताभगिनी स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीसाठी पुढे येत आहेत. या महिलांना त्यांच्या गावातून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वाहनातून ने-आण करण्याची सुविधा आशाताई, अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने केल्याने यास अपेक्षित असा प्रतिसाद मिळाल्याचे आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले.

            वीस दिवसात आलेल्या अनुभवावरून हे अभियान अधिक सक्षमपणे राबविण्‍यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाबरोबरच आदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्‍याण विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, या विभागांचा सहभाग घेऊन जास्‍तीत जास्‍त माताभगिनींची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.

             राज्‍यातील साडेतीन कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करावयाची असून यात विविध आजाराशी संबंधित १४ पेक्षा जास्त चाचण्या करण्यात येणार आहेत. ह्या सर्व चाचण्या विनामूल्य करण्यात येत असून याचा तपासणी अहवाल मिळताच पुढील उपचाराकरिता संबंधित महिला रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून पुढील औषधोपचार करण्यात येईल. हे औषधोपचार तसेच काही शस्त्रक्रिया करावयाची गरज भासल्यास शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात येईल. याशिवाय आधिकचा खर्च लागणार असेल तर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करून रुग्णांवर उपचार केला जाईल, असेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय स्वयंसेवक देखील उपलब्‍ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

            या विभागाचा मंत्री म्हणून आपणास या सर्वांच्या कामाचे कौतुक असून अवघ्या वीस दिवसात एक कोटीचा टप्पा ओलांडला ही खूप मोठी उपलब्धी असल्याचे आरोग्य मंत्री श्री.सावंत यांनी सांगून डॉक्टर्स आणी इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

              जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक यांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम करून शेवटच्या महिलेपर्यंत हे अभियान पोहोचवावे, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले .

      अत्यंत सूक्ष्म नियोजन केल्याने या अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून महिलांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. संसाराचा गाडा चालवताना माताभगिनींची होत असलेली फरपट आपण खूप जवळून अनुभवली असून यातूनच या अभियानाची संकल्पना सुचल्याचे श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.

            सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैद्यकिय अधिकारी आणि स्‍ञीरोगतज्ज्ञांमार्फत १८ वर्षावरील महिलांची, नवविवाहित महिला, गर्भवती यांची तपासणी , औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची सुरवात करण्यात आली असून आशा/अंगणवाडी आरोग्‍य सेविका/सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्‍ध सुविधेबाबत माहिती देण्यात येते.

            तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्‍च रक्‍तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्‍ये अतिजोखमीच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्‍तीत जास्‍त महिलांची आरोग्‍य तपासणी, शस्‍ञक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

            या कालावधीत मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्‍याण विभागाच्‍या समन्‍वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात आले असून यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांना जास्‍तीत जास्‍त महिला व माता यांना याबाबत सूचित करण्याच्या त्यांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

अभियानातील ठळक बाबी

आतापर्यंत एकूण 1,29,57,045 महिलांची तपासणी करण्यात आली.

३० वर्षावरील 108330 महिलांना मधुमेह तर 183206 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे प्राथमिक निदानातून आढळून आले.

एकूण 1177885 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 12894 मातांना उच्च रक्तदाब आढळून आला, तीव्र रक्तक्षय असलेल्या 21856 मातांना आयर्न सुक्रोज देण्यात आले, 111574 मातांची सोनोग्राफी करण्यात आली.

तीस वर्षावरील 12894 महिलांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले तर 21545 लाभार्थींना कर्करोगाची संशयित लक्षणे आढळून आले.

3011890 लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य, तंबाखू सेवन करु नये याबाबत समुपदेशन करण्यात आले.

अभियानात केल्या जात असलेल्या तपासण्या.

  १) वजन व उंची घेऊन BMI काढणे (सर्व स्तरावर)

 २) Hb% ,urine examination,blood sugar (सर्व स्तरावर)

 ३) प्रत्येक स्तरावर HLL मार्फत व संस्थास्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार)

 ४)chest Xray – (ग्रामीण रुग्णालय व पुढील संस्थेत)

 ५) mammography (आवश्यकतेनुसार)

 ६) कर्करोग स्क्रीनिंग, रक्तदाब स्क्रीनिंग , मधुमेह स्क्रीनिंग (३० वर्षावरील सर्व महिला )

 ७)RTI – STI ची तपासणी

 ८) माता व बालकांचे लसीकरण

 ९) स्तनपान

 १०) व्यसन मुक्ति

अशा विविध योजनेंतर्गत अभियान काळात विविध तपासण्या करता येतील याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *