मिठानगर परिसरातील सुरक्षा‍ भिंत धोकादायक असल्याबाबत तत्काळ चौकशी करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

0


       मुंबई, दि. 11 : मिठानगर परिसरातील जुन्या इमारतीच्या आजुबाजूला असलेली सुरक्षा भिंत  धोकादायक असल्याच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  दिले.

          गोरेगाव  पश्चिम येथील पी.साऊथ वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. आमदार विद्या ठाकूर, यावेळी  तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, पांडुरंग वाडी सेंट थॉमस शाळेच्या मैदानापासून ते रोड नंबर ६ पर्यंतचा रस्ता महिनाभरात बनविण्यात यावा. गोरेगाव सुभाष नगर येथील मंगलमूर्ती बिल्डींग येथे एस.आर. इमारतीत  पाण्याचे देयक व मालमत्ता कर  जास्त घेतला असेल तर तो कमी करावा तसेच येथील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी. आरे कॉलनीतील रस्त्याच्या दुरूस्तीबाबत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. गोरगाव परिसरात बेकायदेशीर पार्कींग मध्ये कोणतेही अनाधिकृत बाबी घडत असल्यास पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

      नागरिकांनी विविध २२५ विषयासंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ८० अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

        ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *