
मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 या महिन्याच्या अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या सर्व विभागाचा आढावा, विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात येत असलेले प्रकल्प, भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम यांची माहिती सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांनी आपल्या लेखांतून दिली आहे.
या अंकात राज्य शासनाच्या वाटचालीचा मागोवा घेण्यात आला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातील विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाजाचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 हा कालावधी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात आला. या सेवा पंधरवड्यास राज्यात मोठा प्रतिसाद लाभला. या सेवा पंधरवड्या बरोबरच सेवा हमी कायद्याची माहिती देणाऱ्या लेखांचाही समावेश करण्यात आला आहे.
नुकतेच ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत आणि सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्षाचे दर्शन याविषयी माहिती देणारा लेख, याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.