कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
मुंबई, दि. 4 : जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री श्री. लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक जयशीला तांबे, टीम लीडर परशुराम सुपल यावेळी उपस्थित होते.
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोबोटिक, मोबाईल रिपेअर संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा यांच्या संकल्पनेतून तसेच इनोव्हेशन स्टोरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी रोबोट निर्माण करीत आहेत. जिनेव्हा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभली आहे. भांडुप येथील रामानंद आर्य डीएव्ही कॉलेज येथे शिकणारा प्रीतम संतोष थोपटे, बोरिवली येथील श्री भाऊसाहेब वर्तक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पारस अंकुश पावडे, माटुंगा येथील डीजी रुपरेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संजय साठे, सायन येथील गुरुनानक हायस्कूलचा विद्यार्थी सुमित रमेश यादव आणि वांद्रे येथील माऊंट कार्मेल चर्चची विद्यार्थिनी निखत नईम अहमद खान यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.