खण्ड, 24-01-1950). या विधानावरून या गीताची महती स्पष्ट होते. मद्रास उच्च न्यायालयाने शाळा व महाविद्यालये यांमधून “वंदे मातरम्” हे गीत देशभक्तीची भावना रुजविण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा तरी गायले जावे, असा निर्णय दिला होता. थोडक्यात ‘वंदे मातरम्’ हा शब्द सर्वांसाठीच प्रेरणादायी व सन्माननीय आहे.
“हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाबाबत बोलताना मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणतात की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” ने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांशी होणाऱ्या संवादात, सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात ‘नमस्कार’ व ‘राम राम’ हे दोन शब्द आजही मोठ्या प्रमाणात संबोधनात्मक वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूह, समुदाय, धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे. शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करावे याबाबत स्पष्ट निर्देश कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप मिळेल असे मला वाटते.