अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

0

बुलढाणा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

            मुंबई, दिनांक 12 :  बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या भागात झल्येल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने तत्काळ करावेत. यापासून एकही शेतकरी आणि त्याचे क्षेत्र वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

            सोमवारी (दिनांक 10) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात 107 मि.मी., नायगांव मंडळात 107 मि.मी. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात 105 मि.मी. पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या दोन तालुक्यात अंदाजे 19 हजार 65 हेक्टर शेतीपीकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घेतली.  नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. सदर पंचनामे करतांना नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत गावपातळीवरील यंत्रणेला निर्देश द्यावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते.

            सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पीकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *