*जे मुघलांना – इंग्रजांना जमले नाही ते ही तुम्हीच करून दाखवलं…*

0






महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय व वारकर्‍यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुघलांच्या तसेच इंग्रजांच्या काळात ही अबाधित होती परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासने करिता कधी ही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही. किंवा धर्मसत्तेने कधीही राज्यसत्येकडे तशी परवानगी ही मागितली नाही. देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत असताना. हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणार्‍या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारकर्‍यांच्या उपासनेच्या या मुलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे ? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे ? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारकर्‍यांवर का लादली जात आहेत ?

वारकर्‍यांनी मागितलेल्या माफक मागण्या –
• ७०० वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. या वर्षी तुकाराम महाराजांचा ३६६वा पालखी सोहळा आहे.
• संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महारज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज या प्रमुख संतांच्या पालख्यां सह इतर पूजनीय संतांच्या पालख्या ही पंढरपुरात दाखल होत असतात.
• या पालख्यांसोबत असंख्य दिंड्या असतात. या प्रत्येक दिंडीतील किमान २ वारकऱ्यांना (विणेकरी सह टाळकरी) यांना वारी करू द्यावी.
• मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी.
• ह्यात फक्त दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच कोरोनाचे नियम पळून RTPCR तपासणी करून प्रवासाची परवानगी द्यावी.
• सकाळी प्रवासात अडचण असल्यास वारकरी वारीचा प्रवास रात्रीचा करतील.
• संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील.
• जेष्ठ सप्तमी ते एकादशी अशी २० दिवसांची वारी हवी तर १० दिवसांत पूर्ण करतील.
• तसेच गरज भासल्यास राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा.

विविध स्तरांवरील झालेल्या बैठकीत वारकर्‍यांच्या असे निदर्शनास आले. शासनाने – प्रशासनाने वारकर्‍याच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली. सरकारने वारकर्‍यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. विविध सरकारी जाहीर कार्यक्रमांत, तसेच पालक मंत्रांच्या दौर्यात जमणार्या कार्यकर्त्याची कोव्हीड टेस्ट करण्यात येते का ? पंढरपुरातच झालेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रचार सभांना कोरोनाची नियमावली लागू होत नव्हती का ? कोरोना हा फक्त आषाढी-कार्तीकेच्या वारीतच वाढतो आणि वारकर्‍या मार्फतच पसरतो का ?

सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे.

 भर रस्त्यात वारकर्‍यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावून, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणार्या, आदरणीय हरी भक्त पारायण निरपराध संताना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मा. मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे.
 जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकर्‍यांना सन्मान पूर्वक तत्काळ मुक्त करावे. व त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे.
 आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन या वरील प्रतिबंध दूर करावे. जसे कार्यालयात, बस प्रवासात, थिएटर किंवा हॉटेल मध्ये ५० % उपस्थितीला मान्यता दिली आहे तशी ह्या अनुष्ठानांना अनुमती द्यावी.
 मा. मुख्यमंत्र्यांनी यासर्व प्रकरणाची नैतिक जवाबदारी स्वीकारून सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येवू नये.

लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. व या नंतरही साधू संतांची, वारकर्‍यांची होणारी अवहेना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी संत समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल. याची कृपया गांभीर्याने नोंद ध्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *