ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे ताडोबा भवन उभारणार

0

-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

          मुंबई, दि.11 : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे ताडोबा भवन उभारण्यात येणार असून याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

            सहयाद्री अतिथीगृह येथे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय.एल.पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा,यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे देश विदेशातील अनेक पर्यटक भेट देत असतात; त्यामुळे येथे उभारण्यात येणाऱ्या सोयी सुविधा उत्कृष्ट प्रतीच्या असणे आवश्यक आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या आणि सभोवतालच्या क्षेत्रात पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करण्याला प्राधान्य देण्यात येईल. येथे येणाऱ्या पर्यटकांना सर्व प्रवेशद्वारांवर पर्यावरणपूरक काचेच्या बाटलीत पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच व्याघ्र प्रकल्पातील सर्व पर्यटकांसाठी असलेली वाहने इलेक्ट्रिक आणि सोलर यावर आधारित असायला हवीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

        बांबू फुलांचे योग्य व्यवस्थापन आणि मृत बांबूचे निष्कासन करण्यात येत आहे. आतापर्यंत या व्याघ्र प्रकल्पात (कोअर व बफर क्षेत्रात) अतिरिक्त वाढलेल्या बांबूने व्याप्त क्षेत्र 68 हजार हेक्टर च्या वर असून यापैकी आतापर्यंत 63 टक्के क्षेत्रातील बांबू निष्कासित करण्यात आले आहेत. उर्वरित 37 टक्के बांबू क्षेत्रातील (कोअर भागातील) बांबू विशिष्ट पद्धतीने काढण्याकरिता राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक असून याकरिता पाठपुरावा वेगाने करण्याचे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. व्याघ्र सफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र कामास गती देणे, सर्व विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी चंद्रपूर, मुल आणि चिमूर येथे निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे अशाही सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *