नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा  – उपमुख्यमंत्री

0


                                                               

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे ई-ग्रंथालयाचे लोकार्पण


            नागपूर, दि.1 :- नागपूर महानगरपालिकेमार्फत महाल येथील चिटणवीसपुरा ग्रंथालयाचे थाटात लोकार्पण होत असतांना ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी येथून मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

             नागपूर महानगरपालिकेमार्फत चिटणवीसपुरा येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाची सुरुवात 1998 मध्ये तत्कालीन महापौर सुधाकर निंबाळकर यांनी केली होती. आमदार प्रवीण दटके यांनी पुढाकार घेत आता या ग्रंथालयाचे नूतनीकरण केले असून, पाच मजली इमारतीत मुले व मुलींसाठी वेगवेगळया अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व आधुनिक सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमार्फत अद्ययावत करण्यात आलेले हे तिसरे ग्रंथालय आहे. अभ्यासासोबतच याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. महाल परिसरातील गुणवान विद्यार्थ्यांना इंटरनेटसह सर्व सुविधांचा निश्चितच लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

            केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संबोधनात नागपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घटकांखाली एक हजार कोटी उपलब्ध करुन दिले आहेत, केंद्र शासनासोबतच राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नागपूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

जलकुंभाच्या कोनशिलेचे अनावरण

            अमृत योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील गोदरेज आनंदम् जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला. केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने आदी यावेळी उपस्थित होते. या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे ‘पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण’ योजनेअंतर्गत हे लोकार्पण करण्यात आले. यामुळे गोदरेज आनंदम जलकुंभ कमांड एरिया, नवी शुक्रवारी, दसरा रोड, राहातेकर वाडी, रामाजीची वाडी, राममंदिर परिसरासह मोठ्या लोकवस्तीला याचा लाभ होणार आहे. पाणीपुरवठा उन्नत प्रणाली अंतर्गत महानगरपालिकेमार्फत 32 जलकुंभ प्रस्तावित आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *