पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
dgipr

          मुंबई, दि. 29 : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

          देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

          अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *