राज्याचे फुटवेयर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार

0

– उदय सामंत

उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार

            मुंबई, दि. 9 : राज्यात फुटवेअर आणि लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक वाहन व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेयर आणि लेदरसंदर्भात येत्या महिनाभरात धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

            उद्योग उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून ज्या क्षेत्रासाठी राज्याची धोरणे निश्चित नाहीत अशा क्षेत्रासाठी तत्काळ धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच काही उपलब्ध धोरणांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. फुटवेअर अँड लेदर उद्योगांसाठी येत्या ३० दिवसांमध्ये याबाबत धोरण निश्चित झाल्यानंतर ‘फुटवेयर आणि लेदर क्लस्टर’ उभारण्यात येणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले, विदर्भामध्ये स्टील उद्योगासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या उद्योगांसाठी आवश्यक असणारी संसाधने आपल्याकडे असल्यामुळे स्टील उद्योगासंदर्भात धोरण निश्चित करून लवकरच काही जिल्ह्यांमध्ये स्टील पार्क उभारण्यात येणार आहे.

            श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करीत असून अधिकाधिक उद्योग राज्यात यावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी काही नवीन धोरणांची निर्मिती करून सध्या असलेल्या धोरणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

            पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात राज्य शासनाची भूमिका उद्योजकांना पूर्णपणे सहकार्य करण्याची आहे. नियोजित ‘इलेक्ट्रिक व्हेईकल पार्क’ ला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असून राज्य शासनाकडून योग्य ते प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा, उद्योजक, सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *