शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

0


            मुंबई, दि. 15- विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला शासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा तयार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            साम वाहिनी आयोजित ‘सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा, मंथन विकासाचे’, या कार्यक्रमात राज्यातील शिक्षण क्षेत्राविषयी मंत्री श्री. केसरकर यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, भारत पुढील काही वर्षात सर्वाधिक तरुणांचा देश असेल. या तरुणांची पिढी सक्षम बनविण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी त्यांना पुस्तकी ज्ञान न देता व्यावसायिक शिक्षण देण्यावर शासनाचा भर आहे. या दृष्टीने एचसीएल, टी. आय. एस. एस. या संस्थांबरोबर करार करण्यात आले असून लवकरच ॲमेझॉनसोबत देखील करार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आत्मियता निर्माण व्हावी यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात येत असून, इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांची आवड निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी इतर उपक्रमांमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या दूर करून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. यासाठी नवीन शाळांना मान्यतेसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ते म्हणाले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *