सकारात्मक कृतीशीलता जोपासावी – ब्रम्हकुमारी शिवानी दीदी

0

            मुंबई, दि. 11 : सेवाभावी वृत्तीतून काम केल्यास कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता तर वृद्धींगत होतेच त्यासोबतच आपल्याला एक प्रेरक ऊर्जा प्राप्त होत राहते, त्यामुळे कार्यालय, घर सर्व ठिकाणी सकारात्मकतेने कृतीशील राहण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांनी केले.

            महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेतर्फे मंत्रालयातील परिषद सभागृहात आज सकाळी आयोजित ‘प्रशासनातील मूल्ये आणि नैतिकता’ या विषयावर श्रीमती शिवानी बोलत होत्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रा. कों. धनावडे, आनंद पाटील, ब्रह्मकुमारी केंद्राच्या गायत्री दीदी, नेहा दीदी आदी उपस्थित होते.

            व्याख्याता श्रीमती शिवानी यांनी सांगितले, “आपण नोकरी नव्हे, तर सेवा करीत आहोत, ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. राग प्रत्येकाला येतो. ताण-तणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. राग करण्याऐवजी पर्याय काढण्यावर भर द्यावा. त्यासाठीच ध्यान महत्त्वाचे आहे.  त्यामुळे आपण वेळीच दक्षता घेवून जीवन शैलीत बदल घडविणे आवश्यक आहे. कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता नकारात्मक विचारांना दूर ठेवा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. जीवनात सर्वच जण कुटुंबाच्या सुखासाठी परिश्रम घेतात. त्यासाठी आपले मानसिक आरोग्य चांगले राहिले पाहिजे. म्हणूनच मनाचे भरण पोषण चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे”.

             संघटनेचे अध्यक्ष श्री. धनावडे यांनी या शिबिराच्या माध्यमातून नैराश्यावर मात करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. ब्रह्मकुमारी केंद्राच्या गायत्री दीदी, नेहा दीदी यांनी ब्रह्मकुमारी केंद्राचे कार्य आणि योग याविषयी मार्गदर्शन केले.

            यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *