
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नुकतीच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती केली आहे.नरेंद्र पाटील हे दिवंगत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.
भाजपचे नेते देवेंद्र फडणीस यांनी सन २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित करून या महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नेमणुक केली होती व या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला होता.त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात मात्र त्यांना या पदापासून दूर व्हावे लागले होते.त्यानंतर आता नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदाची संधी दिली आहे.१७ ऑक्टोबर रोजी तसा नियोजन विभागाने नियुक्तीचा आदेश काढला आहे.त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे माथाडी कामगार व मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,आपल्या नियुक्तीबद्दल नरेंद्र पाटील यांनी दोन्ही नेत्यांचे त्यांना प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत.नरेंद्र पाटील हे २०१८ ते २०२० मध्ये या पदावर असताना त्यांनी ५० हजार मराठा उद्योजक होण्यासाठी लक्ष्य गाठले होते.