
11 लाख दिले मुख्यमंत्री निधीस
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आमदार असलेलं नगरसेवक प्रत्येक महिन्याला मानधन घेत असल्याची माहिती समोर आणताच भाजप आमदार पराग शाह यांनी नगरसेवक पदाचे मानधन बंद करण्यासाठी चिटणीस खात्याला पत्र पाठविले आहे. तसेच त्यांनी कुटुंबाच्या वैयक्तिक खात्यातून 11 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहे.
नुकतेच अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात त्यांस माहिती प्राप्त झाली होती की खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. 25,000/- मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150/- भत्त्यासाठी अश्या केवळ चार सभांकरिता दिले जाते. अनिल गलगली यांच्या माहिती नंतर आमदार पराग शाह यांस गलगली यांच्याशी संपर्क साधत कळविले की भविष्यात नगरसेवक पदाचे मानधन घेणार नाही. त्यांनी शब्द पाळत पालिका चिटणीस यांस पत्र पाठवून या महिन्यापासून मानधन तत्काळ बंद करण्याची विनंती केली आहे. शहा यांनी पुढे स्पष्ट केले की आमदार झाल्यावर माझे नगरसेवक पदाचे मानधन बंद झाले असेल याच विचारात होतो मात्र ते सुरु असल्याचे मला अवगत नव्हते.
अनिल गलगली यांनी याबाबत पराग शहा यांचे आभार मानत सांगितले की हा माहिती अधिकार कायदाचा विजय आहे. सकारात्मक बाबीकडे लक्ष वेधले की सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळतो. आता रईस शेख आणि दिलीप लांडे काय निर्णय घेत आहेत की पराग शाह यांचे अनुकरण करतील, याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे