महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
dgipr

            मुंबई, दि. 3 : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश  महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

              महिला व बालविकास  मंत्री श्री.लोढा म्हणाले, सर्व विभागांना  या महिला धोरण मसुद्याची प्रत पाठवून प्रत्येक विभागामार्फत सूचना मागवाव्यात. हे महिला धोरण सर्वसमावेशक व्हावे यासाठी विभागाने  प्रयत्न करावेत. प्रत्येक विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना कशा प्रकारे सर्व समावेशक करता  येतील याचीही माहिती घ्या. महिलांचे सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी या धोरणामध्ये सर्व बाबींचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे.

       महिला धोरणातील उद्दिष्ट गाठण्यासाठी निर्देशांक ठेवण्यात आले आहेत. आरोग्य, शिक्षण, कौशल्य, पायाभूत सुविधा, उपजिविका, सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विभागाने लक्ष द्यावे अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी केल्या.

           या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, महिला व बालविकास उपायुक्त दिलीप हिवराळे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *