राज्य शासनाकडून दसरा भेट एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

0

 महिला उमेदवारांनाही मिळाले सेवापूर्व प्रशिक्षण पत्र

            मुंबई, दि. ४ : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक, वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १ हजार ४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणुकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मंत्रालयात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खानिकर्म मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच विविध विभागाचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पात्र उमेदवारांपैकी आज २७ पुरूष उमेदवारांना नेमणूकीचे पत्र देण्यात आले असून उर्वरीत उमेदवारांना लवकरच नेमणूक देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी दिली.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य

            महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक, वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *