स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीदिनी विविध उपक्रम – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

google image

सेवाग्राम येथून होणार ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ

            मुंबई, दि. 19 : जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल; या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने वर्धा येथे आयोजित ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सेवाग्राम, वर्धा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचा समारोप यावेळी होणार आहे .

            सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबतची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्थानिक आमदार पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

            भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या महात्मा गांधी जयंतीला वर्धा सेवाग्राम येथून राज्य सरकारच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ !

            प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीनेच जनतेने यापुढे एकमेंकाशी संवाद साधताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *